आरंभ मराठी विशेष
धाराशिव –
लोकसभेच्या निवडणुका ऐन तोंडावर आलेल्या आहेत. निवडणुकांचे वातावरण तापायला लागले आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकीय बातम्या जोर पकडत आहेत. धाराशिवमध्ये देखील वेगळे चित्र नाही. महाराष्ट्रातील हाय होल्टेज ठरणारे जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये धाराशिवचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्यातील राजकीय वैर गेल्या अठरा वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. ओमराजे आणि राणा पाटील यांच्यातील राजकीय सामना राज्याच्या राजकारणात देखील चर्चेचा मुद्दा असतो. २००९ मध्ये अगदी नवख्या असणाऱ्या ओमराजेंनी तेंव्हा राज्यमंत्री असलेल्या राणा पाटलांचा विधानसभा निवडणूकीत पराभव केला होता.
पुढे २०१४ मध्ये त्या पराभवाची परतफेड करत राणा पाटलांनी ओमराजेंचा पराभव केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लढणाऱ्या ओमराजेंनी तेंव्हा राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या राणा पाटलांचा पराभव केला होता. २०१७ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील दोघांनीही आपापली राजकीय ताकद दाखवून दिली होती. एकूणच गेल्या दीड दशकापासून धाराशिवचे राजकीय वातावरण कुठल्या ना कुठल्या कारणाने गरमागरम असते.
मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक विम्याच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक झाली होती. या बैठकीत ओमराजे आणि राणा पाटील यांच्यात अरेतुरे आणि हमरी-तुमरी ची भाषा झाली होती. तेंव्हाचा हा वाद फक्त जिल्ह्यातच नाही तर राज्यातही चर्चेचा ठरला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राणा पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि तेंव्हा युती सरकारमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेनेत धाराशिवमध्ये मोठी दरी निर्माण झाली. राणा पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात यापुढे भाजपा आणि शिवसेना एकत्र राजकारण करू शकणार नाहीत हे स्पष्ट होते. त्याचदरम्यान राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा नव्या दिशेने वाटचाल करू लागले.
लोकसभा निवडणुकांची अधिसूचना पुढच्या महिन्यात कधीही येऊ शकते. अशा वेळी महाविकास आघाडी आणि महायुतीने मेळावे घेऊन जोर लावायला सुरुवात केली आहे. मागच्या आठवड्यात महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी ओमराजेंवर थेट हल्ला केला होता. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षाने मेळावा घेऊन आम्हीही सज्ज आहोत, हे दाखवून दिले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या तिखट टीकेवर तितके जोरावर उत्तर दिले नाही. काल आमदार राणा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार ओमराजेंचा उल्लेख ‘अर्धवटराव’ असा केला. पुढच्या दोन तासातच ओमराजेंनी या टीकेवर पलटवार करताना राणा पाटलांचा उल्लेख ‘पावशेरसिंह’ असा केला. पुढचे काही महिने हे वातावरण असेच राहील. आता लोकसभा, पुढे विधानसभा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका क्रमाने असणार आहेत. त्यामुळे पुढचे वर्षभर तरी राजकीय वातावरण शिगेला असणार आहे. परंतु या वातावरणात दोन्ही बाजूने मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा गुद्द्यावर बोलण्याला प्राधान्य दिले जात आहे.
जनतेला विकास हवाय
धाराशिव जिल्ह्यात आजही हजारो प्रश्न आ वासून उभे आहेत. आकांक्षीत जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या या जिल्ह्यात विकासाचा एकही प्रकल्प का येत नाही. यावर दोन्ही बाजूकडून कुणीही बोलत नाही. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यवतमाळनंतर धाराशिव जिल्ह्यात होतात याचीही कल्पना राजकीय नेत्यांना आहे की नाही हा प्रश्न पडतो. २०२० पासून पीक विमा या एकाच मुद्द्यावर दोन्ही बाजूने टीका केल्या जातात, त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. शहरातील राष्ट्रीय महामार्गालागत सर्व्हिस रोडचा प्रश्न, मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्न, धाराशिव शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न हे प्रश्न कित्येक वर्षे तसेच आहेत, यावर कोणत्या नेत्याने काय प्रयत्न केले यावर चर्चा का होत नाही? अगोदर अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते तर आता दोन वर्षापासून महायुतीचे सरकार आहे. म्हणजे जिल्ह्यातील दोन्ही मोठ्या नेत्यांच्या पक्षाची सत्ता मागील काळात होती. या सत्ताकाळात दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यासाठी कोणती कामे केली आहेत हे जिल्ह्यातील जनतेला आपल्याकडून ऐकायचे आहे. मुद्द्यांवरून गुद्द्यावर आल्यास मूळ विकासाचे प्रश्न मागे पडतात. जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्याची खरेच इच्छाशक्ती असेल तर विकासावर बोलावं अशी जनतेची इच्छा आहे. जिथे लोकांना रोजच्या जगण्याची भ्रांत आहे अशा भागात राजकारण करताना लोकांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलण्यापेक्षा एकमेकांवर शेरेबाजी करण्यात राजकीय नेत्यांनी वेळ आणि ऊर्जा घालवू नये अशीच इच्छा इथल्या सामान्य नागरिकांची आहे. तेंव्हा दोन्ही दादांनी विकासावर चर्चा करायला हरकत नसावी.
– सज्जन यादव