धाराशिव शहरातील 117 कोटींच्या रस्त्यांच्या कामांना पुन्हा स्थगिती
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील 117 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पाला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आली आहे. नगरोत्थान महाभियानांतर्गत 26 किलोमीटर लांबीचे 59 रस्ते नव्याने करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. मात्र, या प्रकल्पावर सुरुवातीपासूनच राजकीय वाद निर्माण झाल्याने गेल्या 20 महिन्यांपासून हे काम खोळंबले होते.
अखेर या कामावरील स्थगिती उठवून कार्यारंभ आदेश देण्यात आला असल्याची माहिती आमदार राणा पाटील यांनी 25 ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी शहरभर होर्डिंग्ज लावून त्यांचे आभार मानले. पण, अवघ्या चार दिवसांतच पुन्हा या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.
नगरोत्थान योजनेअंतर्गत धाराशिव शहरातील या रस्ते विकास प्रकल्पाचा निविदा प्रस्ताव 18 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. मात्र, या निविदेसंदर्भात काही तक्रारी आणि निवेदने शासनस्तरावर प्राप्त झाल्यानंतर समितीने या निविदेवर कार्यादेश देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, तक्रारीतील बाबींची वस्तुस्थिती तपासून स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश धाराशिव नगरपरिषदेला देण्यात आले आहेत. हे पत्र कक्ष अधिकारी गजानन आलेवाड यांच्या स्वाक्षरीने आज 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या स्थगितीमुळे धाराशिवमध्ये पुन्हा एकदा राजकारण पेटले आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाविषयी आक्षेप घेतल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतर मंगळवारी मंत्रालयाकडून आलेले स्थगिती पत्र नगरपरिषदेला मिळाल्याने चर्चा रंगल्या आहेत. महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील कामांनाही मागील काही महिन्यांपासून स्थगिती मिळाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील विकासाच्या गाडीस आधीच ब्रेक लागला आहे. त्यात आता रस्ते विकास प्रकल्पालाही स्थगिती मिळाल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सध्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय असून, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डेमय रस्त्यातून सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे काही नागरिकांचा बळी गेला आहे. तर या रस्त्यावर दररोज अपघात होत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाकडून संबंधित तक्रारींची चौकशी करून अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतरच या प्रकल्पावर पुढील निर्णय होणार आहे. दरम्यान, स्थानिक प्रतिनिधींमध्ये मतभेद वाढल्याने हा प्रकल्प पुन्हा किती दिवस थांबणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.








