अनंत चतुर्दशीमुळे कळंबचे मुस्लिम बांधव 28 ऐवजी 29 तारखेला ईद ए मिलाद साजरा करणार
प्रतिनिधी/कळंब
तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद म्हणजेच मोहंमद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाची मिरवणूक जुलूस 28 ऐवजी 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मोठ्याप्रमाणात स्वागत होत आहे.
यंदा ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी येत आहे. कळंब शहरातून दोन्ही उत्सवाच्या हजारोंच्या संख्येत मिरवणूका निघतात. त्यामुळे कोणतीही अघटित घटना घडू नये, शहरातील एकोप्याचे वातावरण अबाधित राहावे, यासाठी शहरातील सकल मुस्लिम बांधवांनी त्यादिवशी मिरवणूक न काढता दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. कळंब शहरात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन एकमेकांचे सण-उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरे करत असतात. ईद ए मिलाद, शिवजन्मोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यात सकल कळंबकर सहभागी असतात.
सद्यःस्थितीत राज्यात सुरू असलेल्या घटना लक्षात घेता कळंबच्या प्रथा-परंपरेला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या निर्णयाचं सकल कळंबकरांच्या वतीने कौतुक होत आहे.