प्रतिनिधी / तुळजापूर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौभाग्यवती लताताई शिंदे यांनी सोमवारी (दि. १०) सायंकाळी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले तसेच त्यांनी तुळजाभवानी मातेची साडी-चोळीची पुजा बांधली. त्यांनी मातेला सोन्याची नथ अर्पण केली. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सौभाग्यवती सौ.शिंदे यांनी घेतलेल्या दर्शनाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई यांनी सोमवारी सायंकाळी तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी मातेची खण- नारळाने ओटी भरून साडी चोळीची पुजा बांधली. यावेळी शिंदे कुटुंबीयांची उपस्थिती होती. पुजारी प्रशांत गंगणे यांनी शिंदे कुटुंबीयांची पुजा बांधली.तुळजापूरचे युवक नेते विशाल रोचकरी यांनी सौ. शिंदे यांचे स्वागत केले.
तुळजाभवानी मातेला साकडे?
राज्यात गेल्या आठवड्यात राजकीय समीकरणे बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची अबाधित राहावी यासाठी सौ. शिंदे यांनी तुळजाभवानी मातेला साकडे घातले असल्याची चर्चा आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानतर सौ.शिंदे यांनी वर्षभरात दुसऱ्यांदा तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले आहे. गतवर्षी आषाढी एकादशी दरम्यान सौ.शिंदे यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले होते.