आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे होणारे अपघात, याबद्दल कुणीही राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी चकार शब्द काढायला तयार नाहीत. नागरिकही मुकाटपणे हे सहन करत आहेत. ‘आरंभ मराठी’ने शुक्रवारी या खड्ड्यांबाबत संवेदनाहीन बांधकाम आणि नगर पालिकेच्या अधिकाऱ्यावर वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान,दुर्दैवाने गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील एका 22 वर्षीय व्यवसायिक तरुणाचा मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे आपण नागरिक म्हणून अजून जणांचे बळी पडण्याची वाट पाहतोय, कोणत्याही राजकीय पक्षांना काहीही देणंघेणं नसेल तर नागरिकांनी उठाव करण्याची गरज आहे.
ओंकार जयदेव जाधवर (22, रा.गवळी वाडा),हा सराफा व्यवसायिक तरुण गुरुवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून बस स्थानकाकडे जात असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान अंबिका मशिन्स या दुकानासमोर असलेल्या खड्ड्यात पडला.खड्ड्यांमुळे दुचाकी वरून पडलेल्या ओंकारच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आले. मात्र सोलापूरला जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.त्याच्या कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओंकार हा शहरात व्यवसाय करत होता. त्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीने नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरंभ मराठी ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेलं वृत्त;अधिकाऱ्यांची शहरातील रस्त्यावरून वरात काढा अन् पालकमंत्र्यांसह आमदारांना स्वागतासाठी उभं करा
शहरातल्या प्रत्येक रस्त्यांवर गतिरोधक बसवावे लागतील, इतकी सुसाट आणि विना सायास वाहने धावत आहेत. कुठेही अडथळा नाही की,खड्ड्यांचा त्रास नाही. मुख्य असो की अंतर्गत सगळे रस्ते कसे गुळगुळीत आहेत. खड्डा तर शोधूनही सापडणार नाही. खड्ड्यांची साधी कुणकुण लागली तरी नगर परिषदेच्या आणि बांधकाम विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची टीम धावत जाते आणि रस्ता पूर्ववत होतो, अगदी महानगरात सुध्दा इतकी सजगता, तत्परता नसेल !. मग अशा कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांचा मान-सन्मान कोण करणार, धाराशिवकरांनी एवढं तरी आता करावं. सजवलेल्या रथावरून पालिकेच्या आणि सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची वाजत गाजत शहरातल्या सगळ्या गुळगुळीत रस्त्यांवरून वरात काढावी. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी म्हणजे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी चौकाचौकात हार घेऊन स्वागताला उभं राहावं.कारण असे अधिकारी पुन्हा होणे नाही.
धाराशिवातील शहराच्या रस्त्यांचे कौतुक आणि त्यावरून होणारे राजकारण काही केल्या संपत नाही. रस्त्यावरून होणाऱ्या राजकारणाचा आणि आरोप-प्रत्यारोपाचा धाराशिवकरांना अक्षरश: वीट आलाय. नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून ३ वर्षे उलटली आणि विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आहे. पालिकेवर खादाड अधिकाऱ्यांची तर सार्वजनिक बांधकाम विभागात माना डोलावणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची सत्ता आहे. भूयारी गटारसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरूस्ती नाही.
रस्त्यांची नवीन कामे झाली नाहीत आणि आहेत त्या रस्त्यांवर खड्डे करून ठेवण्यात आले आहेत. पालिका भ्रष्टाचारांच्या चौकशीच्या फेऱ्यातून अद्याप बाहेर पडलेली नाही,त्यामुळे विकास कामांचा पत्ताच नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हातलाई मंदिरापर्यंत बार्शी रोडची अवस्था जीवघेणी आहे.खड्ड्यांमुळे अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले. शैक्षणिक परिसर असलेल्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, भोसले हायस्कुलच्या समोरील रस्त्यांवरून दररोज हजारो विद्यार्थी, महिला, मुली,ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.थोडाही पाऊस झाल्यानंतर नाल्यांचे पाणी रस्त्यावर येते आणि रस्त्याचे रूपांतर तलावात होते. प्रचंड घाण पाणी,त्यात निर्माण झालेले खड्डे आणि अधिकाऱ्यांकडून होणारी निव्वळ डोळेझाक. हे म्हणजे नागरिकांना जाणीवपूर्वक छळण्याचे घेतलेले टेंडर तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो.खेड्यांची अवस्था कितीतरी चांगली असून, जिह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहराला का छळले जातेय, याचे उत्तर कुणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी देत नाहीत.
पण, यावर बोलतील ते धाराशिवकर कसले..नागरिकांनो, आता निदान एवढं तरी करा, शहराला असे रस्ते देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करा आणि त्यांनी दाखवलेल्या कर्तबगारीबद्दल त्यांची या गुळगुळीत रस्त्यांवरून वरात काढा, कारण असे अधिकारी पुन्हा होणे नाही.