प्रतिनिधी / भूम
त्यांना सरपंचपदावरून पदावरून खाली खेचण्यासाठी ग्रामपंचायतचे जवळपास सगळेच 13 सदस्य एकवटले. त्यांनी रीतसर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. आता सरपंचपद जाणार असं चित्र तयार झालेलं असताना अविश्वास दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर राहिले. घडलं उलटं. सरपंचपद कायम राहिले आणि मग झाला अभूतपूर्व जल्लोष. सरपंचपद कायम राहिल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि सोबत राहीलेल्या एका सदस्यासह सरपंचाने गावातून भव्य मिरवणूक काढली. उंटावरून भव्य मिरवणूक काढत सरपंचाने आपलं अस्तित्व दाखवून दिलं.हा प्रकार घडला भूम तालुक्यातील ईट या गावात.
भूम तालूक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या व मोठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ईट येथील ग्रामपंचायत ओळख आहे. तालूक्यातील राजकारणाचा केंद्रबिन्दू म्हणूनही गावाची ओळख आहे. गेल्या काही दिवसापासून ग्रामपंचायतच्या राजकीय ताणतणावामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचं झालं असं की,सरपंचपद असलेले संजय असलकर मनमानी करत असल्याच्या नाराजीतून गावातील 14 पैकी 13 सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. प्रशासनाने यासंबंधाने बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर राहिले. सरपंच असलकर यांच्या बाजूने केवळ अन्य एकच सदस्य सोबत राहिले. परिणामी संजय आसलकर यांची सरपंचपदी पुन्हा निवड कायम झाली. ही निवड १३ डिसेंबर रोजी झाली.यानंतर १५ तारखेला म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल संजय आसलकर व ग्रामपंचायत सदस्य सयाजी हुंबे या दोघांची उंटावरून वाजतगाजत व फटाक्याची आतषबाजी करत गावामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली.हा अनोखा जल्लोष पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी झाली होती.
काय आहे प्रकरण?
सरपंच असलेल्या संजय आसलकर यांच्या कामावर नाराज होत व काम करत नाहीत, मनमानी कारभार करतात, म्हणून 13 सदस्यानी अविश्वास दाखल केला होता. तहसीलदार सचिन खाडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली होती.या बैठकीसाठी सदस्य हे गैरहजर राहिले होते.यामुळे सरपंच संजय आसलकर यांच्यावर ठेवण्यात आलेला अविश्वास ठराव हा फेटळण्यात आला होता.